जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया व जपानी मेंदूज्वर (JE) यांसारख्या डासजन्य आजारांचा धोका वाढत असून, या पार्श्वभूमीवर “आपला परिसर, आपलं आरोग्य” या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाने जनजागृती मोहिमेस सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, बोदवड, भडगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर व यावल या तालुक्यांमध्ये घरगुती व सार्वजनिक पातळीवर डास नियंत्रणासाठी नागरिकांच्या सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने डासांची पैदास रोखण्यासाठी खालील प्रतिबंधात्मक उपाय सुचविण्यात आले आहेत:
आठवड्यातून एकदा ‘कोरडा दिवस’ पाळून पाणी साठवणाऱ्या भांड्यांची स्वच्छता करावी.
साचलेल्या पाण्यात २-४ थेंब तेल टाकून डासांची उत्पत्ती रोखावी.
नाल्यांची, गटारांची नियमित स्वच्छता करावी.
मच्छरदाणी, डासरोधक मलम आणि झाकणदार कपड्यांचा वापर करावा.
भंगार आणि प्लास्टिक साहित्य घराभोवती साचू देऊ नये.
डासजन्य आजार विशेषतः डेंग्यूचे वाहक डास हे सकाळी आणि संध्याकाळी चावतात व स्वच्छ पाण्यात अंडी घालतात, त्यामुळे अंगणातील कुंड्या, फुलदाण्या, कूलरचे ट्रे आणि नारळाच्या करवंट्यांमध्ये पाणी साचू नये याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“ही जबाबदारी फक्त प्रशासनाची नसून प्रत्येक नागरिकाने आपापल्या परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी घ्यावी, हीच खरी डासमुक्त समाजासाठीची पहिली पायरी आहे,” असे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
या मोहिमेअंतर्गत शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, महिला मंडळे व स्वयंसेवी संस्थांची मदत घेत जनजागृती करण्यात येणार आहे. विविध गावांमध्ये रॅली, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा तसेच आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
“स्वच्छतेच्या सवयी अंगी बाणवून, डासांवर मात करून, रोगराईपासून बचाव करूया” हे संकल्पवाक्य ठरवत, जिल्ह्याच्या आरोग्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.