जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केले असून, त्यामध्ये त्रुटी आढळून आल्याने अर्ज रखडले आहेत. जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून विद्यार्थ्यांना वेळोवेळी SMS, Email व पत्राद्वारे त्रुटींबाबत सूचना देण्यात आल्या असूनही अनेक अर्जदारांनी कार्यालयाशी संपर्क साधलेला नाही.
समितीने स्पष्ट केले आहे की अशा अपूर्ण अर्जांवर निर्णय घेता येत नाही. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती व इतर शासकीय लाभ अडतात. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी तात्काळ संपर्क करून आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समिती अध्यक्षा सौ. नयना बोंदार्डे, उपायुक्त राकेश महाजन आणि संशोधन अधिकारी नंदा रायते यांनी माहिती देताना सांगितले की, जात वैधता अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन असून अर्जाची स्थिती मोबाईलवर पाहता येते. तसेच, वैध प्रमाणपत्र थेट ई-मेलद्वारे उपलब्ध होते. अर्जदारांना त्रुटीबाबतची माहिती SMS, Email किंवा हेल्पडेस्कद्वारे कळवली जाते.
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, ओबीसी आणि विशेष मागासवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र प्राप्त करावे, असे आवाहन समितीने केले आहे.