जळगाव | प्रतिनिधी | पोलिस दक्षता लाईव्ह :- रेशन कार्डधारकांना स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड लिंकिंग आणि ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे. मात्र, वारंवार सूचना देऊनही अनेक लाभार्थी याकडे दुर्लक्ष करत आहेत.जिल्हा पुरवठा विभागाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय आता घेतला आहे. ३१ जुलै २०२५ पर्यंत ई-केवायसी पूर्ण न केल्यास सप्टेंबर २०२५ पासून संबंधित लाभार्थ्यांचे स्वस्त धान्य वितरण कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत रेशन कार्डवरील प्रत्येक लाभार्थ्याला आधार कार्ड जोडणे बंधनकारक आहे. यामुळे धान्य वितरणात पारदर्शकता येण्यासह समाजातील गरजू व्यक्तींना लाभ मिळेल, असा या योजनेचा उद्देश आहे. यासाठी लाभार्थ्यांना रेशन दुकानात जाऊन आपल्या आधार कार्डची प्रत सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी एप्रिल आणि जुलै २०२५ अशा दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही हजारो लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रलंबित आहे.
पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. यावेळी, ई-केवायसीला यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. सप्टेंबर २०२५ पासून केवळ ई-केवायसी पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांनाच धान्य मिळेल. ज्या लाभार्थ्यांचे केवायसी प्रलंबित असेल, त्यांना धान्यापासून वंचित राहावे लागेल. याची जबाबदारी पूर्णपणे लाभार्थ्यांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची असेल, असे पुरवठा विभागाच्या उपायुक्त प्रज्ञा बडे मिसाळ यांनी नाशिकसह धुळे, जळगाव, अहिल्यानगर आणि नंदूरबार येथील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिला आहे.