जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव येथील सुप्रीम कॉलनी परिसरातील शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व पी. ई. तात्या पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
यावेळी होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. सिद्धेश्वर पाटील यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी केली, तर नेत्रचिकित्सक डॉ. जयेश वाल्हे यांनी नागरिकांची नेत्र तपासणी केली. विविध प्रकारच्या होमिओपॅथी औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच काही नेत्ररुग्णांना आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रियेची सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात कॉलेजचे प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स हर्षदा पाटील, श्रद्धा चौधरी, प्राची खालसे आणि देवयानी चव्हाण यांनी शिबिरात सहभाग घेत रुग्णांना वैयक्तिक मार्गदर्शन केले. शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि स्थानिक प्रतिनिधींनी शिबिराच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.
आरोग्य जनजागृतीसाठी उपयुक्त ठरलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले असून, दर महिन्याला असेच मोफत आरोग्य शिबिर राबवले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमावेळी शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक गोविंदा लोखंडे, नितीन अटवाल, भागवत भावसार, मनीषा चौधरी यांसह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.