नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद नगरपरिषदेच्या हद्दीत येणाऱ्या मिळकतधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या 19 मे 2025 रोजी झालेल्या निर्णयानुसार, थकीत मालमत्ता करावरील शास्ती (दंडात्मक व्याज) माफ करण्यासाठी ‘अभय योजना’ लागू करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत, मिळकतधारकांनी शास्ती वगळता उर्वरित थकीत मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम 31 जुलै 2025 पूर्वी भरल्यास, त्यांना शास्ती माफीचा लाभ मिळणार आहे. या तारखेनंतर कर भरणाऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नगरपरिषदेने नागरिकांना ही संधी साधून थकीत कर भरण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमामुळे नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ होणार असून, स्थानिक पातळीवर विकासकामांना चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.