जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- महाराष्ट्र कलाशिक्षण मंडळाच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षांच्या शुल्कात यंदा अचानकपणे दुपटीने वाढ करण्यात आल्यामुळे राज्यभरातील विद्यार्थी, पालक आणि कलाशिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. मागील वर्षी एलिमेंटरी परीक्षेसाठी ५० रुपये, तर इंटरमिजिएटसाठी १०० रुपये इतकी परीक्षा फी होती. मात्र यावर्षी ती अनुक्रमे १०० आणि २०० रुपये करण्यात आली आहे.या वाढीव शुल्कामुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या असून, परीक्षा देणे कठीण झाले आहे. परीक्षा साहित्य, प्रवास व इतर खर्च लक्षात घेता, अनेक विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाने यास तीव्र विरोध दर्शवला आहे. महामंडळाचे राज्याध्यक्ष मा. नरेंद्र बाराई सर यांच्या नेतृत्वाखाली कलाशिक्षण मंडळाकडे तातडीने शुल्कवाढ मागे घेण्याची मागणी करत अधिकृत पत्रव्यवहार सुरू करण्यात आला आहे.राज्यभरातील जिल्हा शाखांमार्फत निषेध व्यक्त करण्यात येत असून, जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रा. आर. एस. पाटील (कलाध्यापक, शिक्षणशास्त्र विद्यालय, जळगाव) यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना ऑफलाइन प्रमाणपत्रे दिली जात नसून प्रश्नपत्रिकाही मेलवर पाठवल्या जात असल्याने वाढीव शुल्काचा आधार काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
“विद्यार्थ्यांचे हक्क आणि संधी जपणे ही मंडळाची जबाबदारी आहे. या अन्यायकारक शुल्कवाढीचा तातडीने फेरविचार व्हावा,” अशी मागणी कलाशिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांकडून करण्यात येत आहे.