कासोदा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- दि. 23 जुलै रोजी कासोदा पोलिसांनी भवानी नगर परिसरातील एका शेतात लिंबाच्या झाडाखाली सुरू असलेल्या पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ₹1,43,750/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्रभारी अधिकारी सपोनि निलेश राजपूत यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. जुगार अड्डा हा अडवाटेच्या शेतात असल्याने पोलिसांनी सुमारे दीड किलोमीटर अंतर पायी जात छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काही आरोपींनी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना शिताफीने अटक केली.
या कारवाईमध्ये अटक करण्यात आलेले आरोपी ईश्वर सुकलाल महाजन, अक्षय राजेंद्र शिंपी, प्रविण आत्माराम पाटील, कैलास निंबा चौधरी, गणेश प्रकाश मराठे या आरोपींविरोधात कासोदा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्यात ₹13,750/- रोख रक्कम व अंदाजे ₹1,30,000/- किंमतीच्या तीन मोटारसायकली असा एकूण ₹1,43,750/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोहेका नरेंद्र गजरे, पोना प्रदीप पाटील, पोकॉ समाधान तोंडे, पोकॉ निलेश गायकवाड, पोकॉ दीपक देसले, पोकॉ कुणाल देवरे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोहेका राकेश खोंडे करीत आहेत.या कारवाईत पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायक कोते यांचे मार्गदर्शन लाभले.
कासोदा हद्दीत अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती प्रभारी अधिकारी निलेश राजपूत यांनी दिली आहे.