जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- एम.आय.डी.सी. औद्योगिक क्षेत्रातील भोसले इंडस्ट्रीज (V-193) येथे कंपनीतून सुमारे ₹1.15 लाखांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या ८ तासांत दोन आरोपींना अटक करत चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही चोरी दि. 20 जुलै 2025 रोजी दुपारी 3 वाजेपासून ते 22 जुलै रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत दरम्यान घडली. चोरट्यांनी सोया पनीर तयार करणारी यंत्रसामग्री व पार्ट्स, तसेच हिरो होंडा स्प्लेंडर प्रो दुचाकी असा एकूण ₹1,15,000/- किंमतीचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी सुरेश रामचंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्ह्यातील वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले.गुन्हे शोध पथकातील पो.उ.नि. राहुल तायडे, पोहेकॉ. गिरीष पाटील, पोकॉ. राहुल रगडे, पोकॉ. विशाल कोळी यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोन संशयित इसमांची ओळख पटवली. गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनंतर प्रशांत ऊर्फ बाप्या साबळे व नितीन ऊर्फ मित्या चव्हाण, (दोघे रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
दि. 22 जुलै रोजी दोघांनाही अटक करून 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे. चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ. संजीव मोरे व पोकॉ. मंदार महाजन करत आहेत.