नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथे ग्रामीण कृषि जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शासकीय कृषि महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील कृषीकन्यांनी एक अभिनव उपक्रम राबवून शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोठ्याचे निर्जंतुकीकरण व स्वच्छता मोहीम राबवली.
संजीवनी घोरपडे, पूनम पवार, वैष्णवी केकाने, आदिती चिंचोले, वैशाली भाई व स्नेहा बनसोडे या कृषीकन्यांनी गावातील पशुपालक शेतकऱ्यांसोबत संवाद साधून “गोठा स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण” याबाबतचे प्रात्यक्षिक दिले. जनावरांचा निवारा स्वच्छ कसा ठेवावा, त्यात कोणते जैवसुरक्षात्मक उपाय योजावेत आणि याचा जनावरांच्या आरोग्यावर व दूध उत्पादनावर कसा सकारात्मक परिणाम होतो, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.
या कार्यक्रमात पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विषयावर सखोल माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील, चेअरमन डॉ. दत्तात्रय पाचारणे, समन्वयक डॉ. बाळासाहेब रोमाडे, कार्यक्रम अधिकारी डॉ. सागर बंड तसेच इतर विषयतज्ञांचे मार्गदर्शन लाभले.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये स्वच्छता व जनावरांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करून त्यांचे उत्पन्नवाढीच्या दिशेने मार्गदर्शन करण्याचा या उपक्रमामागे उद्देश होता, हे विशेष.