“रात्री कॉल आला, आणि त्यांना तिथे बोलावून घेतल्यावर छापा…” ; मनीष भंगाळे
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- पुण्यात रविवारी पहाटे खराडी परिसरातील उच्चभ्रू गृहनिर्माण संकुलात झालेल्या रेव्ह पार्टीवरील पोलिस कारवाईनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं आहे.
मात्र, आता या प्रकरणात इथिकल हॅकर मनीष भंगाळे यांनी एक खळबळजनक दावा करत प्रांजल खेवलकर यांना जाणीवपूर्वक फसवण्यात आलं, असा आरोप केला आहे. भंगाळे यांच्या मते, “खेवलकर यांचा या रेव्ह पार्टीशी कोणताही संबंध नाही. त्यांना एक कॉल आला आणि त्यानंतर त्या ठिकाणी बोलावून घेतल्यावरच पोलिसांनी छापा टाकला. ही संपूर्ण योजना पूर्वनियोजित होती.”
पूर्वी कट्टर विरोधक, आता नवा खुलासा
मनीष भंगाळे हे एकेकाळी एकनाथ खडसे यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जात होते. त्यांनी यापूर्वी खडसे यांच्यावर दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप करत राज्यात मोठी खळबळ निर्माण केली होती. त्यानंतर खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता.
मात्र यावेळी, भंगाळे यांनी खेवलकरांच्या बाजूने उभं राहत त्यांना “ट्रॅप” केल्याचा दावा करत राजकीय कट कारस्थानाचा आरोप केला आहे. भंगाळे म्हणाले, “माझ्याकडे सर्व टेक्निकल पुरावे आहेत कॉल डेटा रेकॉर्ड्स, लोकेशन ट्रॅकिंग व अन्य डिजिटल बाबी ज्या येत्या एक-दोन दिवसांत मी पुणे पोलिसांना सादर करणार आहे.”
राजकीय उलथापालथीची शक्यता
या आरोपांनंतर प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण अटकेनंतर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनीही या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ही कारवाई राजकीय सूडभावनेतून केल्याचा आरोप केला होता.
भंगाळे पुढे म्हणाले, “खेवलकर यांना ना तिथल्या लोकांची ओळख होती, ना त्यांच्याशी पूर्वी संपर्क. त्यांनी कोणतीही गैरकायदेशीर कृती केलेली नाही. पुणे पोलिसांनी जर चौकशी करून कॉल रेकॉर्डस व इतर बाबी पडताळल्या, तर सत्य उघड होईल.”
आता सर्वांचे लक्ष पुणे पोलिसांकडे
या पार्श्वभूमीवर, पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू असून, सिसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि उपस्थितांच्या पार्श्वभूमीची तपासणी केली जात आहे. भंगाळे यांच्याकडून सादर होणारे पुरावे आणि त्याची विश्वासार्हता पुढील तपासाची दिशा निश्चित करणार आहेत.