भडगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पळासखेडे येथील महिंदळे रस्त्यावर असलेल्या सूर्यमित्रा बियर शॉपीमध्ये अनधिकृत देशी आणि विदेशी दारूची सर्रास विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भडगाव पोलिसांनी कारवाई करत तब्बल २८ हजार रुपयांची अनधिकृत दारू जप्त केली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार, काल (मंगळवार) रात्री भडगाव पोलिसांनी बियर शॉपीवर धाड टाकली. यावेळी संदीप जगदीश पवार (वय २२, रा. रुपनगर, पळासखेडा) हा व्यक्ती विनापरवाना दारू विक्रीसाठी बाळगलेली स्थितीत आढळून आला.
कारवाई दरम्यान पोलिसांनी देशी व विदेशी दारूचा एकूण ₹२८,०००/- किमतीचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण कडू परदेशी यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.