जळगाव येथेही शासनाचा आदेश नसतांना “शालार्थ आयडीचे” वाटप..! चौकशीची मागणी.
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यात गाजत असलेल्या ‘शालार्थ आयडी’ घोटाळा प्रकरणात राज्यस्तरीय विशेष तपास पथक (SIT) ने बुधवारी मोठी कारवाई करत नागपूरचे विद्यमान प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे (५०) आणि माजी शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार (४९) यांना अटक केली. दोघांवर १०० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.दोघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आता सत्र न्यायालयात ‘रिव्हिजन’ दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. चौकशीतून आणखी अनेक बाबी उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कार्यकाळात घोटाळ्याचे सत्र
सिद्धेश्वर काळुसे यांनी १६ मार्च २०२४ पासून आजतागायत शिक्षणाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली, तर रोहिणी कुंभार या २१ मार्च २०२२ ते १५ मार्च २०२४ या कालावधीत नागपूर विभागाच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदावर कार्यरत होत्या. त्यांच्या कार्यकाळात बोगस शालार्थ आयडी तयार करून बनावट शिक्षकांना वेतन दिल्याचा आरोप आहे.
शासनाचे आदेशच नव्हते!
शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून कोणतेही अधिकृत आदेश न दिला जात असतानाही, काही वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून शासकीय प्रणालीचा गैरवापर केला. यामध्ये बनावट शालार्थ आयडी तयार करून शिक्षक पदावर भरती करून शासनाची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी रवींद्र पाटील यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातही मोठा घोटाळा उघडकीस येण्याच्या वाटेवर ; शासनाचा आदेश नसतांना शालार्थ आयडी काढले?
शिक्षण विभागात पदाचा गैरवापर करत शेकडो बेरोजगारांची फसवणूक..
नागपूर पाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील अशाच पद्धतीचा बोगस शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे. राजकीय हस्तक्षेपाचा वापर करून बॅक डेटवर शिक्षक भरती करून लाखो रुपये लाटल्याची माहिती समोर येत आहे.संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांकडे शालार्थ आयडी देण्याचा अधिकार नसतानाही, त्यांनी त्यांचे सहकार्य करत बोगस शालार्थ आयडी तयार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे शासनाची आणि शेकडो गरजू, सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट होत आहे.
फाईली मार्गी लावण्यासाठी मोठी रक्कम
या संस्थांमध्ये शिक्षकांची कृत्रिम पदे तयार करून बॅक डेटवर भरती करण्यात आली. काही प्रकरणांमध्ये कागदोपत्री शिक्षक एक, प्रत्यक्ष हजर दुसरे, अशी स्थिती आहे. बनावट शालार्थ आयडी मिळवण्यासाठी शिक्षकांकडून लाखो रुपये घेण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने पार पडली.
माहिती अधिकारात माहिती मिळत नाही असा आरोप..
या बाबत शिक्षण अधिकारी जळगाव यांना माहिती अधिकाऱ कार्यकर्त्यांनी माहिती मागितली असता त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती दिली गेली नाही. मात्र त्यांना प्रत्यक्षात ऑफिसला येऊन भेटण्यासाठी विनंती करण्यात आली. तसेच अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आले. असेच मागील काही दिवसात पीडित शिक्षक शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालना मध्ये माहिती घेण्यासाठी आले असता त्यांना अपमानास्पद वागणूक दिली असल्याचा व्हिडिओ प्रसार माध्यमांमध्ये प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी त्या संबंधित शिक्षण अधिकारीची बदली झाली.
SIT चौकशीची शक्यता
या प्रकरणी फसवणूक झालेल्या शिक्षकांनी लेखी तक्रारी दिल्या असून, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. लवकरच या प्रकरणातही SIT चौकशी होण्याची शक्यता असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
पिडित शिक्षकांतर्फे चौकशीची मागणी
जळगाव जिल्ह्यातही बोगस शिक्षक भरती, शिक्षण संस्था, शिक्षण संस्था चालक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्यासाठी मोठे रॅकेटही काम करत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या प्रकरणाची नागपूर प्रमाणे लवकर जळगाव मधील प्रकरणांची सुद्धा चौकशी करण्यात यावी अशी पीडित शिक्षकांची मागणी जोर धरत आहे.