Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावकानबाई व रानबाई उत्सव : खानदेशातील श्रद्धेची आणि संस्कृतीची अमोल परंपरा

कानबाई व रानबाई उत्सव : खानदेशातील श्रद्धेची आणि संस्कृतीची अमोल परंपरा

लेखक – चंदन सोपान पाटील
मुख्य संपादक, पोलीस दक्षता लाईव्ह..

कानबाई व रानबाई”:- खानदेशाच्या मातीमध्ये अनेक सांस्कृतिक परंपरांचा समावेश आहे. त्यात एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि हजारो वर्षांपासून चालत आलेली “कानबाई व रानबाई” या देवींची उपासना आणि सण उत्सव हे खानदेशातील सामाजिक, धार्मिक आणि ऐतिहासिक जीवनाचे अविभाज्य अंग आहे. काही लोकांमध्ये हा उत्सव खान या व्यक्तीशी जोडून पाहिला जातो, पण हे ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे आहे. या उत्सवाला सुमारे पाच हजार वर्षांची परंपरा लाभलेली आहे आणि यामध्ये खानांचा काहीही संबंध नाही, हे स्पष्टपणे नोंदवणे गरजेचे आहे.

कानबाई म्हणजे राधा, रानबाई म्हणजे चंद्रावली (रुक्मिणी)
अनेक पुरातत्त्वशास्त्रज्ञ, संस्कृती अभ्यासक आणि इतिहासकार यांचे असे मत आहे की, कानबाई ही राधेचे, तर रानबाई ही चंद्रावली किंवा रुक्मिणीचे स्थानिक रूप आहे. विशेषतः खानदेशातील अहिर वंशीय लोक, जे कृष्ण वंशाचे असल्याचे मानले जाते, ते प्राचीन काळापासून या दोन देवींची पूजाअर्चा करत आहेत. अहिर समाज गोपालन, दुधव्यवसाय आणि गुरेपालन यामध्ये निपुण असल्याने त्यांच्या जीवनात राधा आणि कृष्ण यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे होते. स्थानिक बोली आणि श्रद्धा यामध्ये राधा हळूहळू “कानबाई” झाली आणि चंद्रावली/रुक्मिणी “रानबाई”.

गुरू गोरक्षनाथांचा संदर्भ
गुरू गोरक्षनाथ जेव्हा खानदेशात (कान्हदेश) नाथ संप्रदायाचा प्रचार करण्यासाठी आले, तेव्हा त्यांनी पाहिले की येथील जनतेमध्ये कानबाई आणि रानबाई या देवींची मोठी भक्ती आहे. त्यांनी ह्या देवींच्या कथा जाणून घेतल्यावर त्यांचे पूजन स्वीकारले आणि हे जाहीर केले की, “आम्हीही या देवींचेच भक्त आहोत आणि त्या आमच्या भगिनी आहेत”. ही कथा या परंपरेचा नाथ संप्रदायाशी असलेला सुरेख संबंध दर्शवते.

बळसाणे हे खानदेशातील ‘बरसाणा’
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बळसाणे गावातील बार देवी मंदिर हे या परंपरेचे अत्यंत पुरातन केंद्र आहे. येथे राधा-कृष्ण यांची उपासना कानबाई-रानबाई या स्वरूपात केली जाते. बळसाणे हे गाव उत्तर प्रदेशातील बरसाण्याचे स्थानिक प्रतिबिंब मानले जाते. येथे राधा (कानबाई), चंद्रावली (रानबाई) आणि त्यांच्या सख्या यांची पूजा होते.

अहिराणी भाषा आणि परंपरा
अहिराणी ही भाषा यादव/अहिर लोकांची मूळ बोली असून तिचा इतिहास सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे. आजच्या अहिराणी भाषेतील अनेक शब्द आणि धाटणी प्राचीन इलावर्षी भाषेशी साम्य दर्शवते. या भाषेतील सांस्कृतिक परंपरा, गाणी, लोककथा, देवींचे भजन आणि सणांची परंपरा आजही ग्रामीण खानदेशात जिवंत आहे.

रोट उत्सव : श्रावणातील खास पर्व
श्रावण महिन्यात नागपंचमीच्या पहिल्या रविवारी कानबाई-रानबाईचा रोट उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी “रोट” म्हणजे सणाचा महत्त्वाचा नैवेद्य तयार केला जातो. हे रोट घरातील प्रत्येक पुरुष सदस्याकडून ‘सव्वा मुठ’ धान्य (गहू व चण्याची डाळ) घेऊन तयार केले जाते.चक्की आधीच स्वच्छ करून ठेवली जाते. याच दिवशी पुरणपोळी, चण्याची डाळ व लाल भोपळ्याची भाजी, खीर आणि आमटी यांचा भरगच्च स्वयंपाक केला जातो. कांदा-लसूण वर्ज्य असतो. घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते. रंगरंगोटी, नवे पडदे, सजावट यामुळे घराचं रूप पालटतं.

तीन दिवसाचा उत्सव आणि गवरणीचे महत्त्व
हा सण शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस साजरा केला जातो. या तीन दिवसात कानबाई “घरी आलेली” असते. घरातील आणि गावातील प्रत्येक सदस्य तिच्या स्वागतासाठी व्यग्र असतो. सणाच्या निमित्ताने गावात नातलग, बाहेर गेलेली मंडळी, परदेशस्थ व्यक्तीही परत येतात. गावात जणू एक जत्रा भरते.

कानबाईच्या पूजेत मुख्य सेवा करणारी महिला म्हणजे गवरणी किंवा गवळणी.

या गवळणीला राधेच्या मुख्य सख्या – ललिता आणि विशाखा यांचे रूप मानले जाते. तिचा मान मोठा असतो. पूजा, भजन, सेवा ही सगळी तिच्या उपस्थितीत पार पडते.

सणाचे सामाजिक आणि एकात्मतेचे महत्त्व
कानबाई-रानबाईचा उत्सव म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हे, तर गाव एकत्र येण्याचा, आपुलकी आणि बंधुतेचा सण आहे. जिथे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ एकत्र गुंफलेले दिसतो. या सणामुळे आपली भाषा, संस्कृती, इतिहास आणि समाजबंध जपले जातात.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या