विमानतळाच्या मागील बाजूस शेताच्या बांधावर आढळली मृतदेहाची अवस्था; परिसरात खळबळ
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- चप्पल घेण्यासाठी जातो, असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या २९ वर्षीय तरुणाचा मृतदेह तब्बल पाच दिवसांनंतर जळगाव विमानतळाच्या मागील बाजूस असलेल्या शेताच्या बांधावर कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत इसमाचे नाव रामू हशा वास्कले (रा. नांदिया, ता. भगवानपूर, जि. खरगोन, मध्यप्रदेश; सध्या रा. कुसुंबा) असे आहे.रामू वास्कले हा आपल्या पत्नी व चार मुलांसह कुसुंबा येथे वास्तव्यास होता. तो तेथील एका शेतकऱ्याच्या शेतात सालदार म्हणून काम करत होता आणि कुटुंबासह शेतातच राहत होता. दिनांक २६ जुलै रोजी तो आपल्या पत्नीला “गावातून चप्पल घेऊन येतो” असे सांगून घराबाहेर पडला; मात्र तो रात्री उशिरापर्यंत परतलाच नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली, परंतु तो कुठेही सापडला नव्हता.
दरम्यान, दिनांक ३१ जुलै रोजी सकाळच्या सुमारास नशिराबाद शिवारातील विमानतळामागील आत्माराम राजाराम पाटील यांच्या शेताच्या बांधावर रामूचा कुजलेला मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था अतिशय कुजलेली असल्याने त्याचा मृत्यू दोन-तीन दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) पाठवला आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, मृत्यूचे नेमके कारण काय, हे अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली असून मृत्यू अपघाती आहे की त्यामागे काही संशयित बाबी आहेत, याचा तपास सुरू आहे. रामूच्या पश्चात पत्नी, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे.