Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeअपघातजळगाव रेल्वे स्थानकावर भीषण अपघात : चालत्या रेल्वेतून उतरताना महिला वकिलांचा मृत्यू

जळगाव रेल्वे स्थानकावर भीषण अपघात : चालत्या रेल्वेतून उतरताना महिला वकिलांचा मृत्यू

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मंगळा एक्सप्रेस रेल्वे थांबत नसल्याने चालत्या रेल्वेतून उतरण्याच्या प्रयत्नात ॲड.वर्षा साहेबराव बिऱ्हाडे (वय ४०, रा. भोईटे नगर, जळगाव) या महिला वकिलांचा तोल जावून डोक्यावर पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि. ३१ जुलै) रात्री ९ वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर घडली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ॲड. बिऱ्हाडे या जळगाव व कल्याण येथे वकिली करत होत्या. त्या गुरुवारी मंगळा एक्सप्रेसने मुंबईहून जळगावला परतत होत्या. दरम्यान, मंगळा एक्सप्रेसला जळगाव स्थानकावर थांबा नसल्याने ती रेल्वे हळू वेगाने जात होती. काही प्रवासी फलाटावर उतरत असल्याचे पाहून ॲड. बिऱ्हाडे यांनी देखील उतरायचा प्रयत्न केला. मात्र तोल जाऊन त्या थेट डोक्यावर फलाट क्रमांक ३ वर पडल्या.त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. प्राथमिक तपासणीत त्यांच्या मेंदूतील अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाले. तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली; परंतु उपचारादरम्यान शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जळगाव शहरात शोककळा पसरली असून, त्यांच्या नातेवाइकांत वकिली क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहिण आणि मुलगा असा परिवार आहे. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या