जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या ‘आनंद बॅटरी’ कंपनीत घरफोडी करून सुमारे ९७ हजार रुपये किमतीच्या शिसे धातूच्या प्लेट्सची चोरी करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून, चोरीस गेलेला ३२७ किलो वजनाचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली तीनचाकी रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
ही घटना दि. ३१ जुलै २०२५ रोजी रात्री ८.३० वाजेपासून १ ऑगस्ट सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडली. आनंद बॅटरी कंपनीत बॅटरी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ३२५ किलो वजनाच्या शिसे धातूच्या प्लेट्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. या प्रकरणी कंपनी व्यवस्थापकाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली. या पथकात पोउनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, नितीन ठाकूर, गणेश ठाकरे, राहुल घेटे व किरण पाटील यांचा समावेश होता.
गुप्त माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी मोहसिन उर्फ शेमड्या सिकंदर शहा (रा. तांबापुरा, जळगाव) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या माहितीवरून दुसरा आरोपी इम्रान सय्यद हारुण (रा. नशिराबाद) यालाही अटक करण्यात आली. दोघांनी मिळून ही चोरी केल्याचे मान्य केले आहे.चोरीस गेलेल्या एकूण ३२५ किलो शिसे प्लेट्सपैकी ३२७ किलो वजनाच्या १५ प्लेट्स पोलिसांनी हस्तगत केल्या असून, चोरीसाठी वापरण्यात आलेली २ लाख रुपये किमतीची तीनचाकी रिक्षाही जप्त करण्यात आली आहे.
अटक आरोपींना २ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ६ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या गुन्ह्यात सहभागी असलेले अन्य दोन आरोपींमध्ये रहीम उर्फ बाबल्या रशिद खान आणि मेहमुद उर्फ चिनी शेख मोहम्मद यांचा शोध सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी करीत आहेत.