चारचाकी गाडीतून लिफ्ट देत २५ हजारांची फसवणूक ; एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वृद्धाची फसवणूक केल्याच्या प्रकरणात केवळ १२ तासांत आरोपींना अटक करत पोलिसांनी केलेली कारवाई कौतुकास्पद ठरली आहे. चारचाकी गाडीतून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वृद्धाला फसवून २५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
ही घटना दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली. ७० वर्षीय वृद्ध कालींका माता मंदिराजवळ उभे असताना दोन अनोळखी तरुणांनी त्यांना लिफ्ट देण्याचा बहाणा करत गाडीत बसवले. काही अंतरावर गेल्यानंतर या दोघांनी त्यांच्याकडील २५,००० रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि त्यांना गाडीतून खाली उतरवून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद लांडगे, सहायक फौजदार किरण चौधरी व त्यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.ताब्यात घेण्यात आलेले आरोपी अर्जून शेख रज्जाक शेख (वय ३२), रझाकार रेशीम मोहम्मद रईस (वय ३५) (दोघेही रा. रोझा नगर, जळगाव) असून, पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहनही हस्तगत केली आहे. न्यायालयाने दोघा आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते आणि पोलीस उपअधीक्षक श्री. संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.