जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरातील नवीन विस्तारित भागात धाडसी घरफोड्या व चोरींच्या घटनेत वाढ झाली आहे.अंडरपँट (अर्धनग्न) गँगने मध्यरात्रीच्या वेळी मंदिरांचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी दोन मंदिरांसह बंद घर फोडले आहेत.चोरटे परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.एकीकडे जळगाव शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सातत्याने घरफोडीच्या घटना घडतच आहेत.
यातच शहरातील रायसोनी नगरात अंडरपँट (अर्धनग्न) गँगने मध्यरात्रीच्या वेळी मंदिरांचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी दोन मंदिरांमधून चांदीच्या पादुका, मूर्ती, दानपेटीतील रक्कम आणि इतर साहित्य चोरून नेले. तर तिसऱ्या मंदिरात त्यांच्या हाती काहीच न लागल्याने तेथून पेन ड्राईव्ह चोरून नेला. याशिवाय बाहेर गावी गेलेल्यांकडे घरफोडी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये घरफोडी करणारी टोळी चित्रित झाली आहे.एकाच रात्री चार ठिकाणी चोरी झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.रायसोनी नगरमध्ये श्री गजानन महाराज मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी ७०० ग्रॅम चांदीच्या पादुका, गणपतीची दीड फुटाची धातूची मूर्ती तसेच दानपेटीतील रक्कम चोरून नेली. गेल्या अनेक दिवसांपासून ही दानपेटी उघडलेली नव्हती. त्यामुळे रक्कम किती होती, हे नेमके समजू शकलेले नाही. तसेच प्रसिद्ध काशी विश्वेश्वर मंदिरातील लोखंडी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरी झाली. विश्वेश्वर मंदिराची दानपेटी चार महिन्यांपासून उघडलेली नव्हती. त्यातून ८ हजारांची रोकड चोरीला गेली असल्याचा अंदाज आहे. तसेच शहरातील बी.जे.मार्केट येथील विजय पान हाऊस
दुकान फोडून ४ हजार 4०० रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना सोमवारी ४ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आली आहे. याबाबत दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहें.तसेच शिवकॉलनी येथील गट नं.53 व 60 मध्ये भुरट्या चोऱ्या हा नित्याचाच विषय झाला आहे. काहींच्या कंपाऊंडच्या आत मधील सायकल ,भांडी तसेच कपडे चोरीला जात आहेत.दरम्यान रात्रीच्या वेळेस रस्त्यावरील पथदिवे हे बंदच असतात. जवळपास दोन महिन्यांपासून पथदिवे बंद असल्या कारणाने कॉलनी परिसरात खूप अंधार असतो ,याचाच फायदा चोरटे घेत आहेत.रात्री 12 ते सकाळी 4 वाजेपर्यंत पोलिसांनी कडक गस्त घालावी अशी अपेक्षा नागरिकांनी केली आहे.नागरिकांमध्ये भीतीचे सावट असून पोलिस खाते निष्क्रिय झाले असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहेत.
शिवकॉलनी , प्रेमनगर,निवृत्तीनगर , खोटेनगर ,कोल्हेनगर येथील छोटछोटे किराणा दुकाने रात्री साडेअकरा-बारा पर्यन्त सुरू राहतात ,खुलेआमपणे गुटखा ,सिगारेटची विक्री होत असते.टारगट-मवाली तरुण मोठमोठ्याने त्या परिसरात ओरडत असतात.भर रस्त्यावर ते तरुण मोटारसायकली लावत असतात, परिणामी याचा रहिवाशांना त्रास होत असतो. याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालावे अन्यथा एखादी अनुचित प्रकार घडू शकतो ,संबंधित दुकानदारांना पोलिसांनी तंबी द्यावी,समज द्यावी असेही नागरिकांचे म्हणणे आहे. रात्री गस्त घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्वतंत्र पोलीस पथके तैनात करावीत अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.