पारोळा | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- बांबू लागवडीसाठी परवानगी देण्यासाठी ३६ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी वन परिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) मनोज बबनराव कापुरे यांच्यासह दोन सहकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहात अटक केली. ही कारवाई आज पारोळा तालुक्यात करण्यात आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील सडावण गावातील एका व्यक्तीस बांबू लागवडीसाठी परवानगी आवश्यक होती. त्याच्यासह आणखी तिघांनी मिळून सामाजिक वनीकरण कार्यालयाशी संपर्क साधला. त्यांनी संबंधित आरएफओ मनोज कापुरे यांच्याशी चर्चा केली असता, प्रत्येकी १० हजार रूपये अशा चार फाईल्ससाठी एकूण ४० हजार रूपयांची लाच मागण्यात आली.
तक्रारदाराने तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर आज एसीबीच्या पथकाने सापळा रचला. पुन्हा एकदा तक्रारदाराने कापुरे यांच्याशी संपर्क साधला असता, दोघांत ३६ हजार रूपये रक्कमेवर समझोता झाला. ठरल्याप्रमाणे पंचासमक्ष लाच स्वीकारली जात असताना आरएफओ कापुरे, लिपिक निलेश मोतीलाल चांदणे आणि कंत्राटी कर्मचारी कैलास भरत पाटील या तिघांना रंगेहात अटक करण्यात आली.या तिघांविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे व त्यांच्या पथकाने केली. या घटनेमुळे वनविभागातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून स्थानिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.