जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथील ग्रंथालयातील दुर्मिळ व ऐतिहासिक पुस्तकांच्या डिजिटायझेशन कामकाजाचा शुभारंभ आज, सोमवार दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालय व हेरिटेज फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्या हस्ते पार पडले. यावेळी हेरिटेज फाउंडेशनचे प्रमुख मा.भुजंगराव बोबडे, करण माने, हर्षल बऱ्हाटे, कु. भाग्यश्री सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत डिजिटायझेशनच्या कामकाजास औपचारिक प्रारंभ झाला. प्रारंभी सुमारे १५,००० पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्यात येणार असून, महाविद्यालयाच्या ग्रंथालयात एकूण १ लाख २५ हजारांहून अधिक पुस्तके उपलब्ध आहेत. यामध्ये धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, साहित्यिक अशा विविध विषयांवरील आणि अनेक दुर्मिळ ग्रंथांचा समावेश आहे. हेरिटेज फाउंडेशन ही संस्था आजवर भारतभरात ३ लाखांहून अधिक दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखितांचे डिजिटायझेशन यशस्वीरित्या पार पाडले असून, भारतीय ज्ञान परंपरेचे संवर्धन व जतन हाच संस्थेचा मुख्य उद्देश आहे. या कार्यात नूतन मराठा महाविद्यालयाने भाग घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील, प्रा. आर. बी. देशमुख, डॉ. एन. जे. पाटील, डॉ. हेमंत येवले, अविनाश पाटील, अरविंद भोईटे तसेच ग्रंथालय विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन आणि आयोजन सुरळीत पार पडल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.