नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक १ ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. या निमित्त गरोदर माता व स्तनदा मातांसाठी स्तनपानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रबोधनात्मक नाटिका सादर केली. तसेच पोस्टर प्रदर्शनाद्वारेही जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमात आशा सेविका मंगला चौधरी यांनी जन्मानंतर लगेच होणाऱ्या पहिल्या स्तनपानाचे पोषणमूल्य व आरोग्यदायी फायदे सविस्तर सांगितले. यावेळी गरोदर माता व स्तनदा माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. करिष्मा जैन, डॉ. अजय पाल, डॉ. गौरव जाधव, इतर आरोग्य कर्मचारी तसेच गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.