नागपूर | प्रतिनिधी |पोलीस दक्षता लाईव्ह:- राज्यातील वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट असून, आता ती संपायला अवघे सात दिवस उरले आहेत. परंतु अजूनही तब्बल १८ लाख ७९ हजार ९२१ वाहनांवर ही प्लेट बसवायची बाकी आहे. मुदतीत नोंदणी न केल्यास १५ ऑगस्टनंतर वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई होणार असल्याचा इशारा आरटीओ कार्यालयांनी दिला आहे.
पूर्वी ३१ मार्च २०२५ ही मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ती ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आणि आता १५ ऑगस्टपर्यंतची अंतिम संधी आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी खरेदी झालेल्या वाहनांना एचएसआरपी अनिवार्य आहे. मुदतीत बसविले नाही तर १,००० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
जानेवारी २०२५ पासून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत राज्यात फक्त ३ लाख ५५ हजार वाहनांनाच एचएसआरपी बसविण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यात २२ लाख ३४ हजार ९२१ वाहनांना ही प्लेट आवश्यक असून, आतापर्यंत केवळ १५.८८ टक्के वाहनांनीच ती बसविली आहे.
नागपूर जिल्ह्यातील आकडेवारी
एमएच-३१ (शहर) : १,३०,७१८ पैकी १,०९,८७२ वाहनांवर बसविले
एमएच-४९ (शहर) : १,२७,३३६ पैकी १,०८,६७८ वाहनांवर बसविले
एमएच-४० (ग्रामीण) : २,०३,००० पैकी १,३८,००० वाहनांवर बसविले
मुख्य अडचणी
वाहनचालकांचे रेकॉर्ड आरटीओकडे अद्ययावत नाहीत.
मोबाइल नंबर अपडेट नसल्याने ओटीपी मिळत नाही.
दुसऱ्याच्या मोबाइलवरून नोंदणी शक्य, पण प्लेट बसविताना चालकाचा नंबर अपडेट करावा लागतो.
अनेक वाहनांचा डेटा प्रणालीत नसल्याने नोंदणी अडखळते.
सोसायट्यांमध्ये शिबिर भरविण्याचे आवाहन असूनही प्रतिसाद कमी.
प्रादेशिक परिवहन अधिकारी (नागपूर ग्रामीण) विजय चव्हाण यांनी सांगितले की, “सध्या स्लॉट मिळण्यासाठी दोन महिने लागू शकतात. मात्र, कारवाई टाळायची असल्यास पुढील सात दिवसांत तरी नोंदणी करून ठेवावी.”