जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने रविवारी (१० ऑगस्ट) सायंकाळी महाबळ कॉलनी परिसरातील न्यू स्टेट बँक कॉलनी येथे छापा टाकून देहविक्री व्यवसाय चालवणाऱ्या दांपत्याला अटक केली. या कारवाईदरम्यान पश्चिम बंगाल येथील २३ वर्षीय तरुणीची सुटका करण्यात आली.
पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथक तयार करण्यात आले. डमी ग्राहकाला घटनास्थळी पाठवून मिळालेल्या संकेतावर पोलिसांनी दोन मजली घरावर धाड टाकली. तपासात, खालील मजल्यावर संशयित दिनेश संजय चौधरी (३५, रा. दुध फेडरेशन रोड) आणि त्याची पत्नी यमुना राकेश प्रजापती उर्फ भारती दिनेश चौधरी (४२, रा. देवेंद्र नगर, सध्या न्यू स्टेट बँक कॉलनी) बसलेले आढळले. वरच्या मजल्यावरील बंद खोलीत डमी ग्राहकासह तरुणी सापडली.
तिघांना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी आणण्यात आले. दांपत्याविरोधात कुंटणखाना चालविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई महिला पोलीस कॉन्स्टेबल अर्चना घूनावत यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली. कारवाईत पीएसआय सचिन रणशेवरे, हेड कॉन्स्टेबल सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, पोना मनोज सुरवाडे, विनोद सूर्यवंशी, रेवानंद साळुंखे आणि योगेश बारी यांनी सहभाग नोंदविला.