चाळीसगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पदविका धारक पशुवैद्यकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या न्याय मागण्यांबाबत लवकरच पशुसंवर्धन मंत्री सौ. पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले.चाळीसगाव येथे पशु चिकित्सा व्यवसायी संघटना व पशुवैद्यकीय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवस्थापन सेवा संघ यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने आमदार चव्हाण यांची भेट घेऊन प्रलंबित प्रश्न मांडले. यामध्ये डॉ. संजय पाटील, डॉ. भगवान पाटील, डॉ. ज्ञानदेव दातीर, डॉ. संदीप पाटील, डॉ. राहुल साळुंखे, डॉ. दत्तात्रय कोतकर, तसेच जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. दीपक लोखंडे, डॉ. प्रविण पाटील, डॉ. दीपक शेवाळे, डॉ. राकेश पाटील आदींचा समावेश होता.
शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले की, इयत्ता १२ वी विज्ञाननंतर तीन वर्षांच्या कालावधीचा पशु चिकित्सा शास्त्र पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी घेण्यात आला असतानाही अद्याप तो राबवण्यात आलेला नाही. तसेच, दुग्धोत्पादन पदविका धारकांसाठी ३ ते ६ महिन्यांचा पूरक अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय १५ वर्षांपूर्वी घेण्यात आला असूनही तोही अद्याप अंमलात आलेला नाही.
सध्या राज्यात सुमारे १,९०,००० पदविका धारक पशुवैद्यक उपलब्ध असतानाही इयत्ता १० वी नंतर फक्त तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेतलेले तंत्रज्ञ कृत्रिम रेतनाची सेवा देत आहेत, ज्यामुळे चुकीच्या पद्धतीने गर्भाशय हाताळल्यास लाखो जनावरे वंध्य होण्याचा धोका असल्याचेही शिष्टमंडळाने सांगितले. या सर्व बाबी गांभीर्याने घेत, लवकरच संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आमदार चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले. या भेटीत डॉ. हेमंत कुमावत, डॉ. दत्ता जाधव, डॉ. रवी कोळी आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.