यावल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- यावल तालुका विधी सेवा समितीच्या वतीने कोरपावली येथील डी.एच. जैन विद्यालयात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 2012 (पोक्सो) अंतर्गत जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. 12 ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ‘गुड टच’ व ‘बॅड टच’ याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन यावल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्यायाधीश आर. एस. जगताप यांनी केले. प्रमुख पाहुणे शशिकांत वारूळकर होते, तर अध्यक्षस्थानी सुकलाल बोंदर नेहेते, आणि उद्घाटक म्हणून कोरपावली गावचे पोलीस पाटील सलीम रमजान तडवी उपस्थित होते.
शिबिरात मुलांना पोक्सो कायद्याची माहिती देताना सांगण्यात आले की, बाल लैंगिक अत्याचाराच्या बहुतांश घटना ओळखीच्या व्यक्तींकडून घडतात. त्यामुळे योग्य व अयोग्य स्पर्श ओळखणे आणि त्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी आणि आत्मसंरक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ई. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका चारुशीला विनायक नेहेते यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी शाळेचे चेअरमन राकेश वसंत फेगडे, यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजीव तडवी, समांतर विधी सहाय्यक हेमंत फेगडे, अजय बढे तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योगदान दिले.