जळगाव | प्रतिनिधी | पोलिस दक्षता लाईव्ह :- निसर्गकवी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या जयंतीच्या औचित्याने शहरातील काव्यरत्नावली चौकातील बालकवींच्या औदुंबर काव्यकलाकृतीसमोर साहित्यप्रेमींच्यावतीने विशेष कार्यक्रम संपन्न झाला. यात बालकवींनी रचलेली “औदुंबर” या कवितेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कवी तुषार वाघुळदे यांनी तर आभार लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानचे सचिव संदीप जोशी यांनी मानले.
अवघ्या अठ्ठावीस वर्षांच्या आपल्या आयुष्यात अनेक उत्तम कविता निर्माण करून मोठे साहित्यिक योगदान बालकविंनी दिले असे लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संग्राम जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. तुषार वाघुळदे या प्रसंगी म्हणाले,निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे बालकवी हे सहजोदगार आहेत.निसर्गातील विविध दृश्यात त्यांना मानवी भावना दिसतात. म्हणजे हे निसर्गाचे मानवीकरण नाही. किंवा अचेतन वस्तूंवर चेतनारोप नाही. लौकिक सौंदर्याला अनेकदा त्यांच्या कवितेत अलौकिकाचा स्पर्श होतो ,बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे श्रावणाच्या प्रेमात पडले, त्यांची प्रत्येक कविता निसर्गाचे दिलखुलास रूप उभे करते., आपण स्वत:लाही हरवून बसतो. ते स्वतः एकांतप्रिय… या माणसाने फक्त कवितेशी मैत्री केली.. संसारही मांडला.. कविताच त्यांची प्राणसखी! त्यांच्या ‘श्रावणमासी..’ या कवितेचे स्मरण आजही सर्व रसिक वाचकांना होत असते.,असे सांगून बालकवींचे स्मारक त्वरित व्हावे अशी इच्छा श्री.वाघुळदे यांनी व्यक्त केली.
जैन इरिगेशनच्या प्रसिद्धी विभागाचे सहकारी किशोर कुळकर्णी यांनी भादली येथील बालकवींच्या नवीन स्मृतिस्थळाबाबत थेट रेल्वेमंत्रालयात पाठपुरावा केल्याबाबतचा अनुभव सांगितला. या कार्यक्रमास यश पाटील, संजय खेडकर (वन विभाग), जगन्नाथ क्षीरसागर (फुफनगरी), मयूर अरुण चौधरी, गजानन बोरनारे, सौ. निर्मला दामोदर पाटील (वरणगाव), प्रेमवीर पाटील आदी साहित्यप्रेमींची उपस्थिती होती.
*****************