नागपूर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यातील शिक्षण खात्यातील मोठ्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा सूत्रधार निलंबित वेतन पथक अधीक्षक निलेश वाघमारे अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. धरमपेठ येथील राहत्या घरातून गुरुवारी दुपारी त्याला अटक करण्यात आली. वाघमारे गेल्या चार महिन्यांपासून फरार होता.
२०१९ ते २०२५ दरम्यान नागपूर जिल्ह्यातील अनेक शाळा व शिक्षण संस्थांना नियमबाह्य पद्धतीने शालार्थ आयडी देण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. यामुळे पात्र नसलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरकारी निधीतून वेतन देण्यात आले. अंदाजे ५८० हून अधिक आयडी कोणतेही सत्यापन न करता मंजूर करण्यात आल्याने शासनाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला.
या प्रकरणाची सुरुवात विभागीय शिक्षण मंडळातील कर्मचारी रविंद्र पाटील यांच्या तक्रारीनंतर झाली. तपासासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. प्रकरण उघड झाल्यानंतर वाघमारे यांना निलंबित करण्यात आले; मात्र त्यांनी ठिकाण बदलत पोलिसांना चकवा दिला. दिल्ली, मुंबई, गोवा, हैद्राबाद अशा ठिकाणी पोलिसांनी शोधमोहीम राबवली.
गुरुवारी वाघमारे धरमपेठेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळीराम सुतार यांच्या पथकाने कारवाई केली. न्यायालयाने त्यांना १९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक माहितीनुसार, घोटाळ्यातील काही रक्कम गोव्यातील दोन रिसॉर्ट्ससह इतर व्यवसायांत गुंतवण्यात आल्याचा संशय असून पोलिस आर्थिक व्यवहारांची तपासणी करत आहेत. पुढील तपासात संपूर्ण निधीचा मागोवा घेण्यावर भर दिला जाणार आहे.