एरंडोल /प्रतिनिधी/पोलिस दक्षता लाईव्ह :- तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या २ ते ३ दिवसांपासून सततच्या मुसळधार पावसाने शेती, पशुधन आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात उभी पिके जमीनदोस्त झाली, घरांमध्ये पाणी शिरले, पशुधनांचे मोठे नुकसान यामुळे शेतकरी तसेच सर्वसामान्य, गोर-गरिब नागरिक हा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे.
आज आमदार अमोल पाटील यांनी एरंडोल तालुक्यातील रवंजे बुद्रुक व खुर्द पिंपळकोठा प्र.चा., खर्ची, टोळी याठिकाणी शेतकऱ्यांचा शेतात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या आसमानी संकटाने पुर्ण जनजीवन विस्कळीत केले आहे, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आला आहे, सर्वच झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचा सुचना एरंडोल, पारोळा आणि भडगांव येथील प्रशासनाला केलेल्या असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
तसेच या सर्व परिस्थितीवर माझ्यासह प्रशासन लक्ष ठेवून आहे, पावसाचा जोर हा जैसे थे आहे, म्हणून सतर्कता बाळगून आपली शेती साधने, पशुधने ही सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करा, तसेच संकटकाळी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधन्याचे आवाहन आमदार पाटील यांनी याव्दारे केले आहे.