जळगाव | प्रतिनिधी | पोलिस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यात विविध प्रकारच्या गुन्ह्यात वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. अशीच एक घटना घडली भुसावळात घडली आहे..“तुझ्या नवऱ्याला बोलाव, त्याला याच चॉपरने ठार मारीन” असे म्हणत एका विवाहित महिलेला ओळखीच्या व्यक्तीने धमकी आणि शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भुसावळ शहरातील प्रल्हाद नगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पीडितेने भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता आपल्या मुलांसह घरी असताना आरोपी अजिमोद्दीन रिसालोद्दीन शेख (रा. ग्रीन पार्क, भुसावळ) हा अचानक घरी आला. दरवाजावर ठोके मारत असताना पीडितेने खिडकीतूनच त्याला विरोध केला. मात्र, आरोपी संतापून शिवीगाळ करू लागला. घराच्या दाराला लाथा मारल्या. इतक्यावर न थांबता त्याने कमरेला असलेला चॉपर बाहेर काढत “तुझ्या नवऱ्याला बोलाव, त्याला याच चॉपरने ठार मारीन” अशी धमकी दिली. घाबरलेल्या पीडितेने तत्काळ आपल्या पतीला मोबाइलवर संपर्क साधून घटना कळवली. त्यानंतर ११२ या अत्यावश्यक क्रमांकावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. थोड्याच वेळात पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.
आरोपीला पकडून त्याच्या ताब्यातील चॉपर जप्त करण्यात आला.याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहेत.