Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगाव‘उडान’ दिव्यांग पुनर्वसन केंद्रात शाडू माती गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

‘उडान’ दिव्यांग पुनर्वसन केंद्रात शाडू माती गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने रुशील मल्टीपर्पज फाउंडेशन संचलित शासनमान्य ‘उडान’ दिव्यांग पुनर्वसन केंद्रात शाडू माती गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. “माझा बाप्पा, माझ्या हाताने – तोही पर्यावरणपूरक” या भावनेला उजाळा देणाऱ्या या उपक्रमात दिव्यांग विद्यार्थी तसेच सामान्य विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

या शिबिरात प्रशिक्षक डॉ. सविता नंदनवार व डॉ. अनिता पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मूर्तीमागील कलात्मकता, पर्यावरणपूरकतेचे महत्त्व व निसर्गाशी सुसंगत सण साजरा करण्याचा संदेश दिला. उपस्थित विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती बनविण्याचा आनंद घेतला. विशेष म्हणजे, प्रत्येक मूर्तीतील मोदकात विविध बियाणे घालण्यात आले असून भविष्यात ते वृक्षारोपणाला हातभार लावतील.

या उपक्रमाला पीपल बँकेच्या चीफ मॅनेजर शुभश्री दप्तरी यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. शिबिर यशस्वी करण्यासाठी हर्षाली चौधरी, अनिता बाफना, आयुषी बाफना, ऐश्वर्या बाफना, महेंद्र पाटील, ज्योती रोटे, जयश्री पटेल आदींनी परिश्रम घेतले.शिबिरात ‘उडान’ केंद्रातील ४० दिव्यांग विद्यार्थी, हरिजन कन्या छात्रालयातील ४० विद्यार्थिनी व विविध शाळांतील ३० विद्यार्थी अशा एकूण ११० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी छात्रालयाच्या अधीक्षिका प्रतिभा मोगरे व हर्षदा गुरव उपस्थित होत्या.

हा उपक्रम ‘उडान’ दिव्यांग पुनर्वसन केंद्र, मनपा शाळा क्र. ५, पोलीस मुख्यालय आवार, जळगाव येथे पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी रुशील मल्टीपर्पज फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. हर्षाली चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानून समाजहितासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या