जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- शहरात पुन्हा एकदा देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे. एमआयडीसी परिसरातील एच सेक्टरमधील हॉटेल तारा येथे सुरू असलेल्या देहविक्रीवर पोलिसांनी बुधवारी (दि. 20) संध्याकाळी छापा टाकला. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली असून, हॉटेल मालकासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एमआयडीसी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. विशेष म्हणजे, सुटका करण्यात आलेल्या तिन्ही महिला बांगलादेशी नागरिक असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सापळा रचून कारवाई
पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एएचटीयू पथकाने सापळा रचला. हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे खोलीत जाऊन दोनदा लाईट बंद-चालू करून सिग्नल देण्यात आला आणि तत्काळ पथकाने छापा टाकला. त्यात तीन महिलांची सुटका करून पाच जणांना अटक करण्यात आली.
बांगलादेशी असल्याचा संशय
सुटका केलेल्या महिलांकडे कोल्हापूर येथील पत्ता असलेले आधार कार्ड आढळले. मात्र त्यांना भारताचे राष्ट्रगीत माहीत नाही, तसेच मराठी व हिंदी भाषाही येत नसल्याचे पोलिसांना लक्षात आले. त्यामुळे त्या महिला बांगलादेशी असल्याचा संशय बळावला आहे.