जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव जिल्ह्यात वाढत्या अमली पदार्थ तस्करीवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्त कारवाई करत एका इसमाला जेरबंद केले. त्याच्याकडून तब्बल २ लाख ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२२ ऑगस्ट रोजी पहाटे साडेएक वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार गोपाळ गव्हाळे यांना माहिती मिळाली की, एक इसम काळ्या रंगाच्या होन्डा शाईन मोटारसायकलवरून भुसावळ शहरात अवैधरित्या गांजाची वाहतूक करणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक शरद बागल, रवी नरवाडे, हवालदार गव्हाळे, हवालदार संदीप चव्हाण, हवालदार उमाकांत पाटील, नाईक विकास सातदिवे, पो.कॉ. प्रशांत परदेशी व राहुल वानखेडे यांच्या पथकाने तत्काळ भुसावळकडे धाव घेतली.
सदर माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल वाघ यांना देण्यात आली. त्यांच्या आदेशावरून सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पो.कॉ. हर्षल महाजन व परेश बिर्हाडे हे देखील पथकात सहभागी झाले. हॉटेल सुरुची इन समोरील राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवर संशयित इसम दिसताच पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळून जाण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी शिताफीने त्याला पकडले.
त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव अनारसिंग वालसिंग भिलाला (वय ३०, रा. शमलकोट, ता. झिरण्या, जि. खरगोन, मध्यप्रदेश) असे सांगितले. त्याच्याकडून ७५ हजार रुपये किंमतीची होंडा शाईन मोटारसायकल (क्र. MP-०९-VM-४३९५), २ लाख ५ हजार ५०० रुपये किंमतीचा १०.२७५ किलो गांजा तसेच १० हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण २ लाख ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस नाईक विकास सातदिवे यांच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग होता.