जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्यानिकेतन शाळांत गणेशोत्सवानिमित्त शाडूमातीपासून श्रीगणेशाच्या मूर्ती तयार करण्याचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, पर्यावरणपूरक दृष्टीकोन आणि संस्कृतीबद्दल आदरभाव जोपासण्याचा प्रयत्न करण्यात आला.
लहान मुलांनी आपल्या कोवळ्या हातांनी मातीला आकार देत विविधरंगी आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या. शिक्षकांनी यावेळी विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व समजावून सांगितले. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणाऱ्या जलप्रदूषणाबाबत जागरूकता निर्माण करत शाडूमातीच्या मूर्तींचे फायदे स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी मूर्ती घडवणे, रंगवणे व सजावट करण्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रत्येकाने अभिमानाने आपली मूर्ती प्रदर्शित केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असल्याचे शिक्षकांनी नमूद केले.
सांस्कृतिक मूल्यांची जोपासना आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांना विशेष महत्त्व असल्याचे पालक व शिक्षकांनी सांगितले. उपक्रमाला पालकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येत्या गणेशोत्सवात या मूर्तींचा वापर करून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.