जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- एरंडोल तालुक्यातील उमरदे गावाजवळील रस्त्यावर झालेल्या पंप चोरीचा गुन्हा एरंडोल पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणत तिघा आरोपींना अटक केली आहे.
दिनांक 31 मे रोजी एरंडोल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात सुमारे 2 लाख 35 हजार रुपयांचे सबमर्सिबल पंप व सोलर पंप चोरीस गेले होते. गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले होते. या पथकात पो.हे.कॉ. संदीप पाटील, पो.हे.कॉ. हरीलाल पाटील, पो.हे.कॉ. प्रविण मांडोळे, पो.हे.कॉ.राहुल कोळी व पो.हे.कॉ. दिपक चौधरी यांचा समावेश होता.
दरम्यान, पथकाने समांतर तपास व गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 25 ऑगस्ट रोजी आरोपी आकाश लालचंद मोरे (रा. मुगपाठ, पदमालय, ता. एरंडोल) यास नागदुली गावाजवळील पदमालय फाटा येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सदरचा गुन्हा भरत बाबुराव बागुल (रा. केवडीपुरा, एरंडोल) व पृथ्वीराज रतीलाल पाटील (रा. वरखेडी, ता. एरंडोल) या साथीदारांसोबत केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी या तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी एरंडोल पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधीक्षक सौ. कविता नेरकर व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप बी. पाटील, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.