जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी उचललेले पाऊल यशस्वी ठरले आहे. शनिपेठ पोलिसांनी दोन कुख्यात गुन्हेगारांना बेड्या ठोकत त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. अटक केलेल्यांमध्ये महेंद्र उर्फ लहाण्या अशोक महाजन (३२, रा. तळेले कॉलनी) व संदीप विजय नाथ (२८, रा. नाथ गल्ली, तांबापुरा) यांचा समावेश आहे.
महेंद्र महाजन सापळ्यात
यापूर्वी खून आणि प्राणघातक हल्ल्यांच्या गुन्ह्यांमुळे महाजन याला दोन वर्षांसाठी शहरातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र, तो रथ चौक परिसरात वावरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच कारवाई करण्यात आली.
संदीप नाथ चॉपरसह ताब्यात.
दरम्यान गणेशोत्सव काळातील गस्तीदरम्यान भिलपुरा-घाणेकर चौक परिसरात संदीप नाथ हा हातात धारदार चॉपर घेऊन नागरिकांना धमकावताना पोलिसांना दिसला. तत्काळ धाड टाकून त्याला ताब्यात घेण्यात आले.
ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी व उपनिरीक्षक योगेश ढिकले यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकाने केली. पथकात प्रमोद पाटील, शशिकांत पाटील, प्रदीप नन्नवरे, नवजीत चौधरी, योगेश साबळे, रविंद्र तायडे, निलेश घुगे, अमोल बंजारी, पराग दुसाने आणि प्रतिभा खैरे यांचा समावेश होता.