नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद पोलीस स्टेशन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. सध्या सोशल मीडियावर काही व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून, त्यामध्ये नशिराबाद पोलीस स्टेशनमधील काही कर्मचाऱ्यांकडून वाळू माफियांकडून हप्तेखोरी केली जात असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत.
नागरिकांमध्ये संतापाची लाट.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओंमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नशिराबाद परिसरात मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याचे आधीच वारंवार समोर येत असताना, आता पोलिसांचेच संगनमत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. नागरिकांचा थेट सवाल असा आहे की – “जर कायदा राखणारेच अवैध धंद्यात हातमिळवणी करत असतील तर सामान्य जनतेने न्याय कुणाकडे मागायचा?”
नशिराबाद एपीआय आसाराम मनोरे सांगतात… या बाबत मला कोणतीच माहिती नाही.
दरम्यान, या प्रकरणाबाबत संपर्क साधला असता नशिराबाद पोलीस स्टेशनचे एपीआय आसाराम मनोरे यांनी “मला याबाबत कोणतीही माहिती नाही” असे उत्तर दिले. या बाबत मी आतापर्यंत कोणतीही न्यूज पाहिली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्या नंतर मात्र सोशल मीडियावर जोरदार चर्चेला उधाण आले असताना, अधिकारी यांनी अनभिज्ञ असल्याचे सांगणे हा देखील चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या माहितीसाठी पोलीस दक्षता न्यूजच्या वतीने एपीआय मनोरे यांना त्याबाबतच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सर्व न्यूज व्हाट्सअप द्वारे पाठविण्यात आल्या परंतु त्यांची या विषयी आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
परिसरात भीती आणि अविश्वासाचे वातावरण.
या सर्व प्रकारामुळे पोलिस प्रशासनाची प्रतिमा धुळीस मिळाल्याची भावना नागरिक व्यक्त करत असून, परिसरात भीती आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या अवैध वाळू वाहतुकीमुळे स्थानिकांच्या नाराजीला आणखी खतपाणी मिळाले आहे.
प्रशासनाने याप्रकरणी तातडीने चौकशी करण्याची मागणी.
आता या व्हायरल प्रकरणाची वस्तुस्थिती नेमकी काय आहे, तसेच पोलिसांवर झालेले आरोप खरे की खोटे, हे उघड करणे ही वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मोठी जबाबदारी उभी ठाकली आहे. दरम्यान, जनतेतून वरिष्ठ पोलीस अधिकारी व जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून संपूर्ण चौकशी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.