मुक्ताईनगर | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- मुक्ताईनगरजवळील पुर्णाड फाटा परिसरात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लाखो रुपयांचा अवैध गुटखा पकडला असून, या धडक कारवाईने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
राष्ट्रीय महामार्गावरून ट्रकमधून मोठ्या प्रमाणात गुटखा व पान मसाला वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पुर्णाड फाटा येथे नाकाबंदी करण्यात आली. यावेळी संशयास्पद आयशर ट्रक (एमएच-४० सीडी-९३५८) थांबवून तपासणी केली असता, गोण्यांमध्ये गुटखा व सुगंधित पान मसाल्याचा मोठा साठा आढळला. चालकाकडे वाहतुकीसाठी कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ट्रक व मुद्देमाल जप्त करून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत.
या कारवाईमुळे गुटखा तस्करी करणाऱ्यांमध्ये मोठी धडधड निर्माण झाली आहे. या साठ्याचा पुरवठा कुठून करण्यात आला आणि तो कुठे नेण्यात येणार होता, याचा तपास सुरू असून पुढील चौकशीत गुटखा तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.