यावल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने दिनांक 13 सप्टेंबर रोजी देशभरात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार यावल न्यायालयातही ही लोक अदालत होणार असून, यावल विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्यायाधीश श्री. आर.एस. जगताप तसेच सहदिवाणी न्यायाधीश श्री. जी.आर. कोलते यांनी जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा करून नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले आहे.
लोक अदालत ही न्याय मिळवून देण्याची जलद, फायदेशीर आणि सोपी पद्धत असून यात वादी-प्रतिवादींना सहज, समजेल अशा भाषेत निवाडा केला जातो. यामध्ये दोन्ही पक्षांना मान्य होईल असा निर्णय होत असल्याने न्यायालयीन ताण कमी होतो. शिवाय ही प्रक्रिया खर्चिक नसून पुन्हा अपिलाची तरतूद नसल्याने झटपट न्याय मिळतो. त्यामुळे समाजात सौहार्द टिकवण्यासही लोक अदालत महत्त्वाची ठरते. या लोक अदालतीच्या माध्यमातून नगरपालिका अथवा ग्रामपंचायतीची थकीत कर वसुली, नळपट्टी, राष्ट्रीय बँकांची कर्ज प्रकरणे, वीज मंडळाची थकित वीजबिले, भारतीय दूरसंचार विभागाची थकीत फोन बीले आदी विविध न्यायपूर्व अथवा न्यायप्रविष्ट प्रकरणांचा तातडीने निकाल लावला जाणार आहे.
प्रथम वर्ग न्यायाधीश श्री. आर.एस. जगताप यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “दिनांक 13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घेऊन प्रकरणे जलद मार्गाने निकाली काढावीत.”