गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत.
जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीत दाखल झालेल्या मोटारसायकल चोरीच्या प्रकरणातील आरोपीस अखेर जिल्हापेठ पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली असून, न्यायालयाकडून पोलिस कोठडी रिमांड मिळवून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी CCTNS क्र. २५४/२०२५, भा.न्या.सं. कलम ३७९ नुसार मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पथकाला गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील अंजनगाव येथील विनेश चंपालाल बरडे (वय ३०), हा चिंचोली, कुसुंबा परिसरात राहत असून त्याने मोटारसायकल चोरी केली आहे.
या माहितीच्या आधारे जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक तात्काळ डिमार्ट परिसरात गेले. तेथे मेंहदी रंगाचा शर्ट व निळी जीन्स परिधान केलेल्या संशयिताला पाहून ताब्यात घेण्यात आले. त्याने चौकशीत आपले नाव व गावाची माहिती सांगितली. पुढील तपासात त्याचा गुन्ह्यातील सहभाग उघड झाल्याने त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी न्यायालयाकडून आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड मिळवून त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त केली आहे.
सदर कारवाई पो. हवालदार १३०२ शरीफ रहिम शेख यांच्या प्रमुख तपासाखाली पार पडली. यामध्ये पो. महेश महाजन, नरेश सोनवणे, तेजस मराठे, अमितकुमार मराठे, प्रशांत सैदाणे, विकास पहरकर, प्रशांत लाड यांनी सहकार्य केले.
ही कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), मा. श्री. अशोक नखाते (अपर पोलीस अधीक्षक, जळगाव), मा. श्री. नितीन गणापुरे (उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव विभाग) तसेच मा. प्रदीप ठाकूर (पोलीस निरीक्षक, जिल्हापेठ) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.