नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद शहरात आज गणेश विसर्जन मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरुवात होणार असून, सार्वजनिक गणेश मित्र मंडळ मानाच्या गणपतीने प्रथम मिरवणुकीला सुरुवात होईल. त्यानंतर गावातील विविध मंडळ रांगेत सामील होत डीजेच्या तालावर लेझीम पथक व विविध प्रात्यक्षिकांसह दिमाखात मिरवणूकित सामील होतील. यासाठी नशिराबाद नगर परिषद व महावितरणांकडून सुरक्षेपासून ते स्वच्छतेपर्यंत योग्य त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या असून कर्मचारी यावर लक्ष देऊन आहेत. तसेच नशिराबाद पोलिसांकडूनही खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्ताची संपूर्ण तयारी झालेली असून, गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे चित्रीकरण केले जाणार आहे. अनावश्यक गर्दी अथवा संशयित हालचालींवर पोलिस विशेष लक्ष ठेवून आहेत.
विसर्जनासाठी नगरपरिषदेची तयारी पूर्ण.
वाघूर नदी परिसरात नगरपरिषदेने गणेश विसर्जनासाठी सुरक्षेपासून स्वच्छतेपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नदी परिसरात रोषणाई, आपत्कालीन मदत केंद्र, वैद्यकीय सुविधा, स्वच्छतागृहे तसेच पोहणारे कर्मचारी व तराफे ठेवण्यात आले आहेत. मोठ्या मूर्ती विसर्जनासाठी दोन क्रेन उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
महावितरणकडून गणेश मंडळांना सुरक्षेच्या सूचना.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान विजेच्या यंत्रणेमुळे अपघात टाळण्यासाठी महावितरणचे अधिकारी पवन वाघुळदे यांनी विशेष सूचना दिल्या आहेत. उंच रथ, झेंडे वा पताका विद्युत वाहिनीपासून दूर ठेवावेत, स्टीलऐवजी लाकडी किंवा पीव्हीसी पाईपचा वापर करावा तसेच कुठेही तुटलेले अथवा पडलेले वीजतार आढळल्यास तातडीने महावितरणशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस बंदोबस्त आणि ड्रोनच्या नजरेखाली मिरवणूक, एकूण ९४ कर्मचारी बंदोबस्तावर.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नशिराबाद पोलीस यंत्रणा सज्ज राहणार आहे. पोलीस निरीक्षक आसाराम मनोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरवणुकीवर ड्रोन तसेच सीसीटीव्हीद्वारे काटेकोर नजर ठेवली जाणार आहे.
नशिराबाद पोलीस स्टेशनअंतर्गत ५५ मंडळांची नोंद असून यामध्ये २७ गणेश मंडळांचा समावेश आहे. यासाठी २ पोलीस अधिकारी, ३५ पोलिस कर्मचारी, ५ रेल्वे पोलीस, १० स्ट्राईक फोर्स तर ४२ होमगार्डसह एकूण ९४ जणांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे चित्रीकरण होणार असून, अनावश्यक गर्दी अथवा संशयित हालचालींवर पोलिस विशेष लक्ष ठेवणार आहेत.