जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सा.विद्यालयात 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त सर्व शालेय कामकाज इयत्ता 5 वी ते 10 वी मधील निवडक 110 विद्यार्थ्यांनी सांभाळून आपल्यातील वक्तृत्व, नेतृत्व,कर्तृत्व, संभाषण, सहकार्य , अध्ययन, अध्यापन, सेवा,प्रशासन कौशल्य आदी गुणांचा परिचय करून दिला.या वेळेस इयत्ता 10 वी मधील केशव मराठे याने छात्र मुख्याध्यापक, यजुर्वेद काळे याने छात्र उप मुख्याध्यापक, युसुफ पिंजारी, लीना घुगे यांनी छात्र पर्यवेक्षक म्हणून तसेच इतर विद्यार्थांनी वर्गशिक्षक, क्रीडा शिक्षक, विविध विषय शिक्षक, शिपाई आणि शिक्षकांची वेशभूषा करून उत्तम भूमिका बजावली.nया वेळेस विद्यार्थांनी सुरवातीस शालेय प्रार्थना, राष्ट्रगीत, महाराष्ट्र राज्य गीत प्रतिज्ञा, ईश्वर प्रार्थना घेऊन शालेय कामकाजास सुरुवात केली.
त्यानंतर नेहमीप्रमाणे सकाळ व दुपार विभागातील 110 निवडक विद्यार्थांनी सहभाग घेऊन विविध शालेय विषयांच्या तासिका विद्यार्थी शिक्षकांनी घेऊन अध्यापन केले.तसेच शालेय कामकाज सांभाळले.या नंतर दुपार सत्रात भैय्यासाहेब गंधे सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिलीप चौधरी, उपमुख्याध्यापक प्रशांत जगताप, ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे, ज्येष्ठ शिक्षक ए. व्हि.चौधरी, सुभाष पाटील, जगदीश साळुंखे, सोमनाथ महाजन, योगेश सोनजे, ए.डी.पाटील, मंगला भारुळे, श्रीमती अमला पिंपळे, छात्र मुख्याध्यापक केशव मराठे, छात्र उप मुख्याध्यापक यजुर्वेद काळे, छात्र पर्यवेक्षक मुस्तफा पिंजारी, लीना घुगे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व सरस्वती देवता यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली.या वेळेस विद्यार्थांनी शिक्षक दिनानिमित्त भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याची माहिती मराठी,हिंदी,इंग्रजी भाषेत सादर केली .तसेच शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मान केला.तसेच शालेय कामकाज सांभाळताना आलेले अनुभव कथन केले.या वेळेस शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.जी.चौधरी यांनी उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांनी आपल्याला विविध विषयांचे ज्ञान देणाऱ्या सर्वच गुरुजनांचा सन्मान करण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन, आभारप्रदर्शन विद्यार्थ्यांनीच केले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय पदाधिकारी, ज्येष्ठ शिक्षक तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.