नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद परिसरात बिबट्याच्या वावराने पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विमानतळाजवळील गट नंबर परिसरात मध्यरात्री बिबट्याने गाभन गायीवर हल्ला करून तिचा फाडसा केल्याची धक्कादायक घटना घडली.
विलास नाईक यांच्या शेतात चिंचोली येथील संजय भील आपल्या पत्नी व मुलासह वास्तव्यास असून शेती करीत आहेत. दि. ३ सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी बिबट्याने अचानक त्यांच्या गोठ्यात घुसून गाभन गायीचा फाडसा केला. या घटनेमुळे भील कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढावले असून शेतकरी वर्गात भीतीचे सावट अधिक गडद झाले आहे.
याआधीही या भागात बिबट्याने अनेक जनावरांवर हल्ले केल्याने शेतकरी व मजूर वर्गामध्ये प्रचंड भीती पसरली आहे. रात्रीच्या वेळी शेतात काम करणे व झोपणे धोक्याचे ठरले असून ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. घटनेनंतर शेतकऱ्यांनी वनविभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून बिबट्याचा बंदोबस्त करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच नुकसान झालेल्या भिल्ल कुटुंबाला तातडीने नुकसानभरपाई व मदत मिळावी, अशी मागणी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, विमानतळ परिसरात वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तत्काळ पावले उचलून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी मागणी सर्वत्र होत आहे.