Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeयावलशेजाऱ्याच्या बंद घरातून आढळला पाच वर्षीय बालकाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह.

शेजाऱ्याच्या बंद घरातून आढळला पाच वर्षीय बालकाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह.

आई-वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांचा तपास, यावल शहर हादरलं; घरमालक पोलिसांच्या ताब्यात.

यावल | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- यावल शहरातील एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पाच वर्षीय हनान खान या चिमुकल्याचा मृतदेह शनिवारी शेजाऱ्याच्या बंद घरातून आढळून आला. विशेष म्हणजे हा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला असून, या घटनेमुळे पालक व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन दिवसांपासून मुलगा बेपत्ता

यावल शहरात राहणाऱ्या खान कुटुंबाचा चिमुकला मुलगा हनान खान (वय अंदाजे ५ ते ६ वर्षे) हा अचानक बेपत्ता झाला होता. मुलगा घरी न परतल्याने आई-वडिलांनी पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यान, नातेवाईक व नागरिकांनी ठिकठिकाणी शोधमोहीम राबवली, मात्र मुलाचा ठावठिकाणा लागला नव्हता.

काळजात धस्स करणारा शोध

शनिवारी अचानक शेजारील बंद घराच्या वरच्या मजल्यावर दुर्गंधी आल्याने परिसरातील नागरिकांनी चौकशी केली असता, तिथे हनान खान याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. हे दृश्य पाहून नातेवाईक व नागरिकांमध्ये एकच आक्रोश पसरला.

पोलिसांचा तपास सुरू

बालकाचा मृतदेह आढळल्यानंतर यावल पोलिस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. संशयित घरमालकाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. घटनेमुळे बालकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शहरभर भीती व संतापाचे वातावरण आहे.

परिसरात चर्चांना उधाण

ही हत्या की अपघाती घटना, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी नागरिकांत विविध चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांनी दक्षता घेत तपास सुरू केला असून लवकरच सत्य समोर येईल, असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या