जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह:- रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या गाजलेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी अल्पावधीतच तीन आरोपींना अटक करून ६ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. या चोरीचा तपास पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
घटनेची हकीकत…
माजी मंत्री आणि आमदार मा. एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताई निवासस्थानात, शिवराम नगर, जळगाव येथे २७ ऑक्टोबरच्या सायंकाळी ७ वाजेपासून २८ ऑक्टोबरच्या सकाळी ८ वाजेपर्यंत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोंडा तोडून मोठी चोरी केली. या दरम्यान विविध सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. फिर्यादी चेतन सुरेश देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ३६७/२०२५, भा.दं.सं. (BNS) कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास आणि आरोपींचा शोध…
पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ (रामानंद नगर), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि त्यांच्या पथकांनी सततच्या तपासातून संशयितांचा शोध सुरू केला. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी शोधण्यात आली.वाहनाच्या तपासात ती जियाउददीन हुस्नोददीन शेख (रा. मास्टर कॉलनी, जळगाव, वय ३९) याच्या नावावर असल्याचे समोर आले. चौकशीत त्याने आपल्या नातेवाईकांसह हा गुन्हा केल्याचे उघड केले. त्यानंतर पोलिसांनी त्यास ३० ऑक्टोबर २०२५ रोजी अटक केली आणि सुजुकी दुचाकी (क्र. MH-19-ER-5539) जप्त केली.
सोनाराकडे विकलेला मुद्देमाल परत मिळवला…
पुढील तपासात गुन्ह्यातील दागिने विक्रीसाठी उल्हासनगर येथे पाठविण्यात आल्याचे निष्पन्न झाले. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी चिराग इकबाल सैय्यद (वय २२, रा. उल्हासनगर) यास ताब्यात घेतले. त्याने हे दागिने कैलास हिराचंद खंडेलवार (वय ४८, रा. कल्याण) या सोनारास विकल्याचे सांगितले.दोघांना ३ नोव्हेंबर २०२५ रोजी अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
३१.९७० ग्रॅम सोन्याची लगड,
३.०३० ग्रॅम सोन्याचे रिंग,
३.२२० ग्रॅम डायमंड सोन्याचे कर्णफुल,
२.००० ग्रॅम सोन्याची गोलरिंग,
४.४९० ग्रॅम सोन्याची अंगठी,
३.९९० ग्रॅम सोन्याचे कर्णफुल,
८.४३० ग्रॅम सोन्याची चैन व पेंडल,
३.११० ग्रॅम सोन्याचे गोल कडे,
२१७.४०० ग्रॅम चांदीची गणपती मूर्ती.
असा एकूण ६,२४,००० रुपयांचा सोन्याचा दागिने आणि २१,००० रुपयांची चांदीची मूर्ती असा एकूण ६.४५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मुख्य आरोपींचा शोध सुरू
सदर गुन्ह्यातील फरार आरोपी…
१) मोहम्मद बिलाल उर्फ बिल्ला अब्दुल करीम चौधरी
२) एजाज अहमद उर्फ सलीम अब्दुल चौधरी
३) बाबा (पूर्ण नाव माहीत नाही)
सर्व रा. उल्हासनगर, मुंबई — हे आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.यापैकी एजाज अहमद याच्यावर मुंबईतील माटुंगा, व्ही.पी. रोड, नारपोली, ताडदेव, नवपाडा, वापी इत्यादी ठाण्यांमध्ये सुमारे २० घरफोडीचे गुन्हे नोंद आहेत, तर बिलाल आणि एजाज या दोघांविरुद्ध अर्बन, MIDC, ताडदेव पोलिस ठाण्यांतही गुन्हे दाखल आहेत.
प्रशंसनीय कामगिरी करणारे अधिकारी व पथक…
या यशस्वी तपास मोहिमेत पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, राजेंद्र गुंजाळ, उपनिरीक्षक सचिन रणेशवरे तसेच पोलीस कर्मचारी सुशिल चौधरी, सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपुत, विनोद सुर्यवंशी, हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, योगेश बारी, मनोज सुरवाडे, अतुल चौधरी, गोविंदा पाटील, शरद बागल, शेखर डोमाळे, अक्रम शेख, विजय पाटील, प्रितम पाटील, नितीन बाविस्कर, किशोर पाटील, मुरलीधर धनगर, रविंद्र कापडणे, राहुल रगडे, दिपक चौधरी, बबन पाटील, प्रदीप चौरे, महेश सोमवंशी आणि कुंदनसिंग बयास यांनी मोलाची भूमिका बजावली.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो. उपनिरीक्षक सचिन रणेशवरे हे पो.नि. राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
पोलीस दलाने दाखविलेल्या तत्परता, सूक्ष्म तपास कौशल्य आणि समन्वयामुळे शहरातील या मोठ्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा झाला असून, फरार आरोपींच्या अटकेनंतर आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.

