जळगाव | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- जळगावात शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली. आमदार चव्हाण यांनी ३६ वर्षीय विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून पाटील यांनी लैंगिक शोषण केल्याचे आरोप मांडले. एवढेच नव्हे तर त्या महिलेला व तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आणि स्वतःलाही गोळी घालण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगत त्यांनी बैठकीतच कॉल रेकॉर्डिंग उपस्थितांना ऐकवले.
बैठकीनंतर आमदार चव्हाण थेट एमआयडीसी पोलिस ठाण्यात गेले. “या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अन्यथा मी पोलिस ठाणे सोडणार नाही,” अशा ठाम भूमिकेतून त्यांनी जवळपास पाच तास ठिय्या दिला. दरम्यान निरीक्षक संदीप पाटील स्वतः पोलिस ठाण्यात आले आणि “मला अटक करा” अशी मागणी करत स्वतःची बाजू मांडली.
मात्र, गुन्हा दाखल करण्याच्या टप्प्यावर संबंधित महिलेनं ऐनवेळी तक्रार देण्यास नकार दिला. “मी उद्या घरच्यांशी चर्चा करून निर्णय घेईन,” असं सांगून ती ठाण्यातून निघून गेली. दुसऱ्या दिवशी शनिवारीही पोलिसांनी तिची वाट पाहिली. रात्री साडेआठपर्यंत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अधिकारी उपस्थित होते, पण शेवटी महिलेने “मला तक्रार द्यायची नाही,” असा स्पष्ट निरोप पाठवला.
यामुळे आमदार चव्हाण यांनी केलेले गंभीर आरोप हवेत विरले. पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांनी याबाबत स्पष्ट केलं की, “एखाद्या महिलेनं तक्रार दिल्यासच गुन्हा दाखल होतो. तक्रारदाराने नकार दिल्यास पोलिसांच्या हाती काहीच राहत नाही.”
दरम्यान, या वादग्रस्त प्रकरणानंतर निरीक्षक संदीप पाटील रजेवर गेले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात या घडामोडींनी चर्चेला उधाण आलं आहे.