Tuesday, September 17, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याआनंदाची बातमी; राज्यात जंबो शिक्षकभरती; राज्यातील उमेदवारांचे प्राधान्यक्रम नोंदविण्यास झाली सुरुवात..

आनंदाची बातमी; राज्यात जंबो शिक्षकभरती; राज्यातील उमेदवारांचे प्राधान्यक्रम नोंदविण्यास झाली सुरुवात..

मुंबई/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेली शिक्षक भरतीला आता हिरवा झेंडा मिळाला आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक पदभरतीला अखेर सुरुवात झाली आहे.

उमेदवारांना ८ फेब्रुवारीपर्यंत प्राधान्यक्रम नोंदविता येणार.

२१ हजार ६७८ पदांच्या भरतीची जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता पदभरतीसाठी उमेदवारांचे प्राधान्यक्रम नोंदविण्यास सुरुवात झाली आहे.उमेदवारांना ८ फेब्रुवारीपर्यंत प्राधान्यक्रम नोंदविता येणार आहेत.

एकूण रिक्त पदांवरील ८० टक्के जागांवरील भरतीला राज्य सरकारने दिली परवानगी.

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांतील १२ हजार ५२२, १८ महापालिकांतील २ हजार ९५१, ८२ नगरपालिका आणि नगरपरिषदांतील ४७७; त्याचबरोबर राज्यातील १,१२३ खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील ५,७२८ रिक्त जागांवरील शिक्षकभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२’मधील प्राप्त गुणांच्या आधारे ही प्रक्रिया राबविली जात आहे. सध्याच्या एकूण रिक्त पदांवरील ८० टक्के जागांवरील भरतीला राज्य सरकारने परवानगी दिली आहे; मात्र बिंदुनामावलीवर काही आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या जागांवरील बिंदुनामावलीवरील आक्षेपांमुळे १० टक्के कमी जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सद्यस्थितीत जिल्हा परिषदांमधील रिक्त जागांपैकी ७० टक्के जागा भरल्या जाणार आहेत. तसेच उर्वरित राखून ठेवलेल्या १० टक्के जागांवरील भरतीबाबत नंतर निर्णय घेतला जाईल, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पवित्र पोर्टलवरील पदभरतीशी संबंधित सर्व बाबींसाठी edupavitra2022@gmail.com वर पत्रव्यवहार करण्याची सूचना.

भरती होत असलेल्या पदांमध्ये पहिली ते पाचवीच्या वर्गांसाठी सर्वाधिक १० हजार २४० शिक्षकांची नियुक्ती होणार आहे. त्याखालोखाल सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी ८ हजार १२७ शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या जातील. नववी आणि दहावीसाठी दोन हजार १७६, तर अकरावी आणि बारावीच्या वर्गांसाठी १ हजार १३५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ पदांची, तर मुलाखतीसह ४ हजार ८७९ पदांची भरती केली जाणार आहे. पद भरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्तायादी प्रसिद्ध केली जाईल. त्याचे संभाव्य वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच पवित्र पोर्टलवरील पदभरतीशी संबंधित सर्व बाबींसाठी edupavitra2022@gmail.com या ई-मेलवर पत्रव्यवहार करावा, असे आवाहन राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी केले आहे.दरम्यान ज्यांनी बी.ए. एम.ए. डी. एड, बी.एड.आणि तसंम शिक्षण घेतले आहे ,त्यांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या