मुंबई | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या आषाढी वारीत लाखो वारकरी सहभागी होणार आहेत. वारी मार्गात त्यांना आवश्यक मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, असे निर्देश राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.
सार्वजनिक आरोग्य, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा, स्वच्छता, ऊर्जा आणि सार्वजनिक बांधकाम विभागांनी समन्वय साधून कार्यवाही करावी, अशी सूचना त्यांनी केली. वारी मार्गात कायमस्वरूपी सोयी-सुविधा निर्माण कराव्यात, तसेच पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे, वैद्यकीय सुविधा आणि विजेची व्यवस्था यावर विशेष भर द्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
आजपासून वारीला औपचारिक सुरुवात होत असून, संतांच्या पालख्यांबरोबर लाखो भक्तांचा ओघही सुरू झाला आहे. त्यांच्या सुरक्षिततेसह आरोग्य आणि स्वच्छतेसाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ राबवाव्यात, असा आग्रह यावेळी मंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी धरला.