मुंबई | प्रतिनिधी |पोलीस दक्षता लाईव्ह :- राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांच्या अर्ज प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिलेल्या स्पष्ट निर्देशानुसार आता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करताना शेतकऱ्यांना सातबारा (७/१२) आणि ८अ उताऱ्याची गरज भासणार नाही. यामुळे अर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शक, सोपी आणि जलद होणार आहे.
शासनाच्या ॲग्रीस्टॅक (AgriStack) उपक्रमाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या डिजिटल यंत्रणेमुळे, शेतकऱ्यांचा सर्व तपशील आता थेट प्रणालीद्वारे मिळवला जातो. त्यामुळे अर्ज करताना कोणतेही दस्तऐवज अपलोड करण्याची आवश्यकता उरलेली नाही.
कृषी विभागाच्या नव्या निर्णयानुसार:
कोणत्याही सहाय्यक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी ७/१२, ८अ मागू नयेत
अर्ज प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना
पूर्वीची अडचण:
काही तालुक्यांतील कृषी अधिकाऱ्यांनी कागदपत्र नसल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्ज नाकारले होते. परिणामी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या धोरणात अनेक पात्र शेतकरी योजनांपासून वंचित राहत होते.
नव्या प्रणालीचे फायदे:
✅ कागदपत्रांची कटकट संपली
✅ अर्ज मंजुरी अधिक जलद
✅ पारदर्शक व न्याय्य प्रक्रिया
✅ केंद्र शासनाच्या डिजिटल ॲग्रीस्टॅक उपक्रमाशी एकात्मता
शेतकऱ्यांना आवाहन:
जर तुमच्याकडे ॲग्रीस्टॅक ओळख क्रमांक (AgriStack ID) असेल, तर तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर थेट कृषी योजनांसाठी अर्ज करू शकता – कोणतीही अतिरिक्त कागदपत्रं न देता.
शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असून, कृषी योजनांची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि परिणामकारक होणार आहे.