AIMIM च्या वतीने पत्रकार परिषद घेत दिली माहिती…
नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथे काल दि. २ नोव्हेंबर रोजी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाच्या वतीने एक पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत येणाऱ्या नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची निवडणूक रणनीती, उमेदवारीचे आराखडे तसेच जनतेसमोरील विकासनिष्ठ अजेंडा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पत्रकार परिषदेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, एआयएमआयएम पक्ष या निवडणुकीत एकूण पाच प्रभागांमधील १० नगरसेवक पदांवर तसेच एक नगराध्यक्ष पदावर पूर्ण ताकदीने उमेदवार उभे करणार आहे. स्थानिक पातळीवरील सामाजिक आणि विकासात्मक कामांच्या जोरावर पक्ष नागरिकांसाठी एक सक्षम, पारदर्शक आणि उत्तरदायी पर्याय ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आमच्या पक्षाच्या विचारसरणीशी जुळून घेणाऱ्या घटक पक्षांशी आम्ही युती करण्यास तयार आहोत असे त्यांनी नमूद केले. मात्र त्यात नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा (AIMIM) पक्षाचाच असेल आणि आमचा लढा हा प्रामुख्याने भाजप विरोधातच असेल असेही त्यांनी आवर्जून सांगितले. पक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, एआयएमआयएम गेल्या १३ वर्षांपासून नशिराबाद परिसरात सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा, न्याय्य हक्क आणि प्रामाणिक प्रशासन मिळावे, हा पक्षाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पत्रकार परिषदेला जळगाव जिल्हाध्यक्ष जनाब आसिफ पटेल, वरिष्ठ नेते अशरफ तडवी, जळगाव तालुकाध्यक्ष जनाब वसीफ सर, तसेच नशिराबाद शहराध्यक्ष जनाब आसिफ मुबल्लिग हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.पत्रकार परिषदेदरम्यान पक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “जनतेच्या विश्वासाच्या बळावर एआयएमआयएम नशिराबाद नगरपरिषदेत एक सक्षम, प्रामाणिक आणि विकासाभिमुख पर्याय निर्माण करेल. नशिराबादचा विकास, पारदर्शक कारभार आणि सर्वसमावेशक प्रगती हा आमचा मुख्य हेतू आहे.”
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एआयएमआयएमची ही पहिली पत्रकार परिषद चर्चेचा विषय ठरली असून, स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चिन्हे दिसू लागली आहेत.

