नशिराबाद | प्रतिनिधी | पोलीस दक्षता लाईव्ह :- नशिराबाद येथील धार्मिक परंपरेला उजाळा देणाऱ्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर पारायण व अखंड हरीनाम कीर्तन सप्ताहाची सांगता मंगळवारी भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली. समस्त माळी पंच मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. सुनील महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहाला संपूर्ण ग्रामस्थांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात ४ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या भव्य पालखी सोहळ्याने झाली. मंदिरापासून दुपारी ४.३० वाजता काढण्यात आलेल्या या पालखीने वरची आळी भागात भक्तिमय वातावरण निर्माण केले. टाळ-मृदंगाचा गजर, ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष आणि भक्तीगीतांच्या सुरांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
सप्ताहाच्या सांगतेप्रसंगी आयोजित काल्याच्या कीर्तनात प्रमुख कीर्तनकार ह.भ.प. सदाशिव महाराज सागरीकर यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना समाज प्रबोधनावर भर दिला. “तरुणांनी देव, देश आणि धर्माच्या उन्नतीसाठी सर्वप्रथम पुढाकार घ्यावा. केवळ भक्तीपुरती धर्मसेवा मर्यादित न ठेवता समाजाला योग्य दिशा देण्याची जबाबदारीही नव्या पिढीने उचलावी,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले. “देवाकडे मागण्यापेक्षा चांगले कर्म करा, परमेश्वर फळ नक्की देतो. धर्मकार्य आणि परमार्थ कधीही वाया जात नाही,” अशी शिकवण देत त्यांनी संत परंपरा पुढे नेण्याचे महत्त्वही अधोरेखित केले. कीर्तनादरम्यान सदाशिव महाराजांनी आपल्या विनोदी, पण तितक्याच अंतर्मुख करणाऱ्या शैलीत बेटी बचाव–बेटी पढाव, व्यसनमुक्ती, मोबाईलचा अतिवापर या विषयांवर भाष्य केले. हसवताना त्यांनी समाजातील वास्तव समोर ठेवले आणि प्रत्येक श्रोत्याला विचार करायला भाग पाडले.तरुणींना मोलाचा संदेश देताना ते म्हणाले, “आई-वडिलांनी तुमच्यासाठी केलेल्या त्यागाची किंमत कधीही विसरू नका. मोह, प्रलोभन आणि चुकीच्या मार्गाला बळी न पडता आपल्या कुटुंबाचा आणि संस्कारांचा सन्मान जपा.”
संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात मागील ५५ वर्षांपासून ही धार्मिक परंपरा सुरू आहे, हे विशेष. या वर्षीही सप्ताहात भागवत कथा ज्ञानयज्ञ, पारायण, नामस्मरण आणि कीर्तन सेवा भक्तीभावाने पार पडली.कीर्तनासाठी नशिराबादसह परिसरातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वरची आळी भागातील नागरिक व समस्त माळी पंच मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.धर्म, संस्कार, समाज प्रबोधन आणि एकतेचा संदेश देणाऱ्या या सप्ताहाने नशिराबादकरांच्या मनात भक्तीचा दीप पुन्हा एकदा तेवत ठेवला आहे.

